अनुभवशिक्षणाचं अनपेक्षित दर्शन- Young Entrepreneursचा उत्स्फूर्त विक्री उपक्रम!
०७/०३/२०२४
आज ह्या तीन young entrepreneurs ची भेट घडली! सातवीतले दोघे मित्र - वेदांत, शारंग, आणि तिसरा वेदांतचा लहान भाऊ अवनीश!
सकाळी नेहमीप्रमाणे गाडीवरून प्रबोधिनीत येत होतो. अलिकडच्या, एटीएम शेजारच्या फूटपाथकडे लक्ष गेलं, तर तिथे निळ्या गणवेशातली तीन मुलं फूटपाथवर बेडशीट अंथरून, त्यावर कसली तरी चित्र मांडून उभी आहेत असं दिसलं. काहीतरी वेगळं, विशेष चालू आहे हे लक्षात आलं, पण प्रशालेची वेळ पाळायची म्हणून धावत-पळत वर गेलो. छे! राहावलं नाही म्हणून बॅग ठेवून पुन्हा पळत खाली आलो.
गेलो तेव्हा अजूनही ते तिथेच आहेत हे पाहून बरं वाटलं. जरा ओळखीचे चेहरे वाटत होते, पण चटकन लक्षात आलं नाही. त्यांनी मात्र लगेच ओळखलं - "हृषीकेश दादा!? अरे आम्ही विज्ञान दलावर येत होतो!".
अरे व्वा! मग सुरू झाल्या गप्पा!
"इथे हे काय करताय?"
"दादा, आज आम्ही आमची स्वतः रंगवलेली चित्रं विकतो आहोत!"
"अरे वा! हे कसं काय सुचलं? कोणी सांगितलं तुम्हाला?"
"आमचं आम्हीच ठरवलं!"
बास.. खरंतर हेच वाक्य पुरेसं होतं! त्यांनी हे असं काहीतरी स्वतःहून करावंसं वाटणं, आणि ते करायला निघणं हे पाहून फारच आनंद झाला!
जरा गप्पा झाल्यावर कळलं की ह्या बाल-उद्योजकांचा खरंतर हा दुसरा startup! पहिला केला होता तो स्वतःची जुनी, चांगली खेळणी विकण्याचा! त्या उद्योगाचा अनुभव घेतल्यावर काय ठरवलं, तर म्हणे "ती खेळणी आमच्याकडे आधीपासून होती. आता आम्हाला स्वतःहून काहीतरी बनवून विकायचं आहे." म्हणून त्यांनी आज हा चित्रांचा उद्योग थाटला होता!
(प्रत्येक वाक्यानंतर उद्गारवाचक चिन्ह टाकण्यावाचून माझ्याकडे पर्यायच नाहीये. मी खरंच त्यांच्या एकेका वाक्यावर थक्क होत होतो!)
शारंग आणि वेदांत हे दोघे मुख्य कलाकार आणि उद्योजक. त्यांनी स्वतः सुंदर चित्रं काढली होती आणि स्टार्टप फाउंडर्स म्हणून पूर्ण उद्योगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. आणि वेदांतचा चौथीतला लहान भाऊ अवनीश हा, त्यांच्याच शब्दांत, "आमचा accountant". अवनीशचं काम म्हणजे कोणत्या कलाकाराची किती चित्रं कितीला विकली गेली आणि त्याचे पैसे रोख जमा झाले की ऑनलाईन याची त्याच्या वहीमध्ये काटेकोर नोंद ठेवणे. तो हे काम अतिशय चोखपणे करत होता.
त्यांनी ठेवलेला qr code पाहून "ऑनलाईन सुद्धा ठेवलंत हे बरं केलंत" असं म्हणालो. त्यावर म्हणाले - "मागच्या वेळी ऑनलाईन नव्हतं, म्हणून जवळपास १०० रुपयांची झालेली खरेदी एक जण नको म्हणून निघून गेले. तसं ह्यावेळी नको व्हायला म्हणून आम्ही ह्या वेळी ऑनलाईनचा ऑप्शन सुद्धा ठेवला.". अनुभवातून शिकत होते तर!
"काय काय वेगळे अनुभव आले?"
"दादा अरे, २०-२५ रुपयांमध्ये सुद्धा लोक बार्गेन करायचा खूप प्रयत्न करतात."
"मग? तुम्ही देता का डिस्काउंट?"
"थोडा देतो. पण मग आम्ही ठरवलं की ५ रूपयांपेक्षा जास्त कोणालाच डिस्काउंट द्यायचा नाही."
९:३० वाजता त्यांची शाळा सुटल्यावर तिघं त्यांचं हे सगळं गाठोडं घेऊन आले होते आणि ११-११:१५ पर्यंत त्यांनी त्यांची सगळी चित्रं विकली सुद्धा! मुद्दाम गर्दीचा रस्ता पाहून प्रबोधिनीजवळची ही जागा त्यांनी निवडली होती. आपला कशात खर्च किती, आपल्याला हवा असलेला नफा किती, किंमत कशी ठरवायची, हिशोब कसा ठेवायचा, आलेल्यांशी कसं बोलायचं, कोणाला काय माहिती द्यायची, कोणाला कसं convince करायचं हे सगळं अनुभव घेऊन हे दोघं खूप छान शिकत होते. मिळवलेले हे पैसे कोणत्यातरी प्रकारे समाजकार्यासाठी वापरायची त्यांची इच्छा आहे.
त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना युवक विभागात दलांवर मुलं करत असलेल्या विक्री उपक्रमाबद्दल सांगितलं. विक्रीचे आकडे ऐकले तेव्हा दोघांचेही डोळे एकदम चमकले! ह्यॅ.. भितीनी किंवा दडपणानी नाही. त्यांना आता एक अजून मोठं नवीन चॅलेंज दिसलं म्हणून! ते ते नक्कीच पूर्ण करतील.
खूप वेळ गप्पा झाल्या नंतर मी निघायच्या तयारीतच होतो. पण हे दोघे तर पक्के उद्योजक! असे कुठे सोडतायत! जणू "गप्पें बहुत हुए. कुछ लेंगे भी?" अशाच विचारानी असेल का पण त्यांनी मला विचारलं- "दादा, तू कोणतं चित्र घेणार?".
हसत, त्यांच्या उद्योजकतेला आणखी एक दाद देत मी मला आवडलेलं चित्र निवडलं. अर्थातच abstract. QR कोड स्कॅन केला, त्यांचे पैसे जमा झाल्याचं त्यांना दाखवलं, आणि त्यांना त्यांच्या ह्या मोठ्या प्रयत्नांना एक छोटंसं, कॅडबरीरूपी बक्षीसही देऊन निघालो. पण चित्रावर चित्रकाराची सही घेतल्याशिवाय नाही हां! मला पुढे कधीतरी सांगता आलं पाहिजे - "I have an original of Sharang and Vedant!"
--
ह्या सगळ्यातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे - या तिघांचे पालक. इतका सगळा वेळ ते कुठेच आसपास दिसले नाहीत. ‘तुमचं झालं की फोन करा’ असं त्यांनी मुलांना सांगितलं असावं. मुलांकडे फोन नव्हता, जवळच्या एका दुकानदाराशी बोलून त्यांच्या फोनवरून मुलांनी घरी फोन केला. त्यात काय!
आज मुलांना शिकण्याचं, धडपडण्याचं एवढं स्वातंत्र्य देणारे पालक नाहीतच अशा समजुतीत मी असताना हा अतिशय सुखद धक्का होता.
मुलांच्या "मला हे करून पाहायचं आहे."ला तत्क्षणी "चल, करून पाहा. मी आहे." म्हणणारे पालक आजच्या काळात मोजकेच दिसतात.
दोघांच्या पालकांशी दिवसभरात फोनवर बोलणं झालं. मुलांना स्वतःहून सुचलेल्या कल्पनेच्या पाठीमागे ते सुज्ञ, सजग, आणि खंबीरपणे उभे आहेत हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. अनुभवातून शिकणं आणि त्यासाठी गरजेचं निर्णयाचं आणि त्याहून महत्त्वाचं, चुकण्याचं स्वातंत्र्य ते ठरवून मुलांना देत आहेत हे खूप कौतुकास्पद आहे. ते स्वातंत्र्य द्यायचं असेल तर मुलांना मोकळं सोडायला हवं. काय करायचं, काय शिकायचं हे त्यांचं त्यांना ठरवू द्यायला हवं. आपल्या नजरेआडही मुलं चांगलं काहीतरी करून आपलं आपण शिकत असतात ह्यावर विश्वास ठेवायला हवा.
बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या अशा, शाळेसारख्या अतिनियोजित नसलेल्या वातावरणातूनही होणाऱ्या शिक्षणाकडे पालक आणि शिक्षकांचंही दुर्लक्ष होतं. पण असेच अनुभव हे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनण्याकडे प्रवास घडवून आणत असतात.
"आम्ही हे करतोय ते बरोबर केलं ना" अशी वाटत असलेली चिंता फोनवर बोलल्यावर कमी झाली अशीही प्रतिक्रिया एका पालकांनी दिली. माझ्या चष्म्यातून मी पाहिलेल्या ह्या उद्योजकतेतून मुलांच्या होत असलेल्या शिक्षणाचं त्यांना कथन केल्यावर त्यांनाही हायसं वाटलं.
--
ह्या बाल-उद्योजकांकडे पाहून, भरपूर प्रेरणा घेऊन मी तिथून निघालो. स्वयंप्रेरणा आणि उत्साह यांची माझ्याकडे कधी कमतरता भासली तर त्यांच्या चित्राकडे बघून ती पुन्हा भरून नक्की निघेल!
वा sss फार भारी. मराठी लोक कल्पकतेत, हुशारीत नक्कीच कुठेही कमी नाहीत. असेच थोडेसे धाडस केले की झाले, यशस्वी होणारच.
ReplyDeleteखरी कमाई 🍰
ReplyDeleteया तीन बाल उद्योजकांचे आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप कौतुक. हे तिघेही आयुष्यात खूप सफल होणार यात काहीही शंका नाही.
ReplyDeleteसगळ्यात महत्वाचे वाक्य " आमचे आम्ही xx " सांगितले तर अनुसरण करणारे पैशाला पासरी मिळतील.. हीच शिक्षणव्यवस्था गरजेची आहे खूप उद्गारचिन्ह !!!!!
ReplyDeleteव्वा ! सुंदर शब्दांकन!
ReplyDeleteह्या उत्साही नवउद्यमी चमुला खूप खूप शुभेच्छा!!!
ही घटना एक प्रातिनिधिक आणि आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी. मुलांना शिक्षण घेताना स्वयंरोजगाराचे धडे मिळणे अत्यावश्यक आहे. यातून न लाजता केलेल्या कष्टाची आणि त्यातून मिळवलेल्या पैशांची किंमत आपोआप कळेल. तसेच हृषीकेश ने लिहिल्या प्रमाणे सेल्स, मार्केटिंग, अकाऊंटिंग, इत्यादि व्यवसायाच्या अनेक अंगांची ओळख धडपडून मुले आपलीआप मिळवतील. प्रबोधिनी च्या एकूण संस्कारात बसणारीच ही गोष्ट आहे. हृषीकेश ने खूप छान शब्दांकन केले आहे. या सर्व होतकरू मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा.
ReplyDeleteउद्याच्या उद्योजकांना सलाम.
ReplyDeleteशब्दांकन पण सुरेख