गणपती ओळखता आला पाहिजे...
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥
------
(ह्या लेखाच्या निमित्तानी नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे. थोड्या थोड्या काळानी काही तरी लिखाण सुरू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. प्रतिसाद ऐकायला नक्की आवडेल.)
------
कोण्या एका गावात एक दगडू काका राहत होते. गावात कोणताही समारंभ असला की त्याच्या तयारीत काका कायम पुढे! कोणाच्या घरी लग्न असो की बारसं. त्याची आमंत्रणं वाटायला, पूजा मांडायला, हार-फुलांनी सजावट करायला, शाल-श्रीफळ आणायला (काही वेळा द्यायलाही!) दगडू काका कायम अग्रेसर!
गेल्या वर्षी गावचा गणेशोत्सव असाच एकदम थाटामाटात साजरा झाला. काकांनी पुढाकार घेऊन अतिशय दिमाखदार आरास केली होती. फुलांच्या माळा लावल्या. मूर्तीला मोठाले हार घातले. प्रतिष्ठापनेला भटजी बोलवले. त्यांनी "टॅणॅऽऽणॅणॅ... स्वाहा!" अशा नाकातून काढलेल्या, सुरेल पण दुर्बोध आवाजात मंत्रही सांगितले. अगदी पारंपरिक पद्धतीनी सर्व सोपस्कार होऊन सुंदर पूजा झाली आणि गणेशाची मूर्ती विराजमान झाली.
दररोजच्या पूजेची तयारी सुद्धा तशीच नीटनेटकी आणि पद्धतशीर! समया, धूप, फुलं, हार, शंख, घंटा,... सगळं! कशातही कसर झालेली काकांना चालायची नाही. दहाही दिवस दररोज दोन वेळेला आरत्या अगदी नित्यनेमानी झाल्या. त्यालाही घाट खूप मोठा. आरत्या महानिरांजन घेऊनच झाल्या पाहिजेत असा आग्रह. आरती संपते ना संपते की प्रसाद वाटपाला काका तयार!
दहा दिवस दर वर्षीप्रमाणे लहान मुलांचं विविधगुणदर्शन, चमचा-लिंबूच्या स्पर्धा, विनोदी (?) एकपात्री कार्यक्रम झाले. बघता बघता दहा दिवस कसे गेले कळलंच नाही. काका सगळ्या धामधुमीत पार बुडून गेले होते. शेवटच्या दिवशीही ढोल-ताशे वाजवत वाजत-गाजत नदीत गणपतीचा विसर्जन झालं. काका पार घाम येऊन थकेपर्यंत नाचले!
अकरावा दिवस उजाडला. गणपती गेल्यामुळे काकांना फार सुनंसुनं वाटत होतं. दहा दिवस एवढ्या उत्साहात उत्सव साजरा करूनही काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं, पण काय ते कळे ना. "का बर असं वाटतंय?" काकांनी खूप विचार केला. डोकं खाजवलं पण काह्ही कळत नव्हतं.
"अरे!!"
काकांच्या डोक्यात ट्यूब पेटली.
"एवढे दहा दिवस आपण इतका मन लावून गणपतीचा उत्सव साजरा केला. केवढी आरास आणि केवढा बढेजाव! पण एवढ्या दिवसात आपण गणपतीच्या मूर्तीला नमस्कार तरी केला का!?"
"एवढा घाट घातला आणि मुख्य गोष्टच राहून गेली!"
कशी मजा नाही का? ज्या गणपतीसाठी एवढा मोठा घाट घातला त्या गणपतीलाच नमस्कार करायचा राहून गेला! कमाल झाली! ती गणेशमूर्ती काळी की गोरी हेही काकांना आठवे ना.
------
असे गणपती विसरलेले दगडू काका प्रत्येकच क्षेत्रात दिसतात. आपल्या कामाचा मुख्य गणपती कोणता याचा अनेकांना विसर पडलेला असतो.
म्हणजे काय?
पुण्यातल्या दुकानदारांबद्दल नेहमी एक विनोद केला जातो. "पुण्यातल्या दुकानांत सर्वांत दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक!". मूळ विनोद पुलंचा. आपल्या कामाचा गणपती विसरल्याचं हे असंच एक लख्खं उदाहरण. दुकानाचा घाट हा मुळातच गिऱ्हाईकाभोवती, गिऱ्हाईकाच्या सोयीसाठी घातलेला असतो हेच विसरलं गेलं की अशी परिस्थिती होते.
असे विनोद प्रत्येकच क्षेत्राबाबत करता येतील का?
"शाळेत सर्वात दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थी!"
"बँकेत सर्वात दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे खातेधारक!"
"राजकारणात सर्वात दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे मतदार!"
असे आणखीही किती विनोद सुचतील!
आपण जे काम करतो आहोत त्याचा मुख्य गाभ्याचा भाग कोणता हे जर कायम लक्षात ठेवलं नाही तर अशी, वरच्या विनोदांमध्ये दर्शवलेली, स्थिती उद्भवते. याला कामाचा गणपती विसरणं असं म्हणता येईल.
शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांना खरोखर त्यांचा विकास होईल असं ‘खरं’ शिक्षण मिळतं का? की फक्त पुस्तकं घोकून परीक्षेत तशीच्या तशी वाक्य ओकण्याला शिक्षण म्हटलं जातं? मोठ्या कंपन्यांमध्ये ग्राहकांप्रति खरीच आस्था असते की आस्थेचा आव आणला जातो? शासनदरबारी जनतेसाठी कामं होतात का? की नोकरदारांच्या आणि राजकारण्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी? सगळे डॉक्टर्स् रुग्णाच्या उपचाराला आणि परवडणूकीला प्राधान्य देतात की काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्याला देतात? सगळेच शास्त्रज्ञ खऱ्या संशोधनाला प्राधान्य देतात की जे ‘विकेल’ अशा खोट्या संशोधनाला सुद्धा? हार्वर्ड विद्यापीठातल्या ‘फ्रान्सेस्का जीनो’ ह्या प्रामाणिकपणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञेवर नुकताच अनेक संशोधनांत खोटारडेपणा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे; तो बहुतांशी सिद्धही होतो आहे. ह्याहून हास्यास्पद आणि चिंताजनक काय असू शकतं? कहर!
गणपती विसरण्याचेच होणारे हे सगळे परिणाम आहेत.
ह्याच्या उलट उदाहरण एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेटीला गेलो असताना पाहायला मिळालं. त्या भेटीत तिथल्या डॉक्टरांनी दीनानाथच्या वर्णनार्थ सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे "पेशंट सेंटर्ड ॲप्रोच". रुग्णकेन्द्रित दृष्टीकोन. रुग्णालयातल्या सगळ्या गोष्टी रुग्णसेवेसाठीच केल्या जातात. दीनानाथच्या वैद्यकीय संचालकांनी- डॉ. धनंजय केळकरांनी ह्याच वृत्तीचं वर्णन "विश्वस्त वृत्तीनी काम करणं" असं केलं. कोणाच्याही व्यक्तिगत फायद्याचा विचार केंद्रस्थानी न ठेवता रुग्णांची सेवा केंद्रस्थानी ठेवायची. ती सेवा करताना जी काही आर्थिक उलाढाल होईल ती पुन्हा रुग्णांच्याच सेवेत वापरायची.
'रुग्ण' हा रुग्णालयाचा गणपती असेल, तर त्याच्या सेवेसाठी उत्तमातली उत्तम यंत्रणा आणि सुविधा हवी. उत्तम सुविधा हव्या असतील तर ती उभी करू शकणारी उलाढाल मोठी हवी. ते उत्पन्न जर त्याच रुग्णांकरवी उभं केलं तर रुग्ण‘सेवे’चा मुद्दाच निकालात निघेल. भरमसाठ शुल्क आकारावं लागेल, गरजू रुग्णांचे उपचार करता यायचे नाहीत, त्यांना गणपती करता यायचं नाही. हा तिढा सोडवायचा कसा?
सेवाभाव, विश्वस्त वृत्ती, आणि उत्तमता यांचा तिहेरी समतोल साधण्याचं दीनानाथचं उत्तर चांगल्या "रॉबिन हुडींग" सारखं दिसतं. रॉबिन हूड हे श्रीमंतांना लुटून गोरगरिबांमध्ये तो पैसा वाटणारं पात्र. 'चांगलं' रॉबिन हुडिंग म्हणजे श्रीमंतांची 'लूट' न करता त्यांना उपचारापलिकडच्या सोयीसुविधा पुरवून त्याच्या शुल्काचा वापर गरीब रुग्णांसाठी करणे. अर्थात हेही पुरेसं नसतं; देणग्यांचाही खूप मोठा वाटा ह्या कामात असतो. आपल्या कामाचा गाभा स्पष्ट असेल तर ते घडवून आणण्याचे मार्ग शोधून काढता येतात.
पण लोकांना मुळात कामाच्या गाभ्याचा विसर का बरं पडत असेल?
कामाचा गणपती विसरण्याची मुख्य तीन कारण मला वाटतात-
१. अज्ञान/ निष्काळजीपणा, २. दूरदृष्टीचा अभाव, आणि ३. स्वार्थीपणा.
ही तीनही कारणं स्वतंत्र नसून एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत हे लगेचच लक्षात येईल. जिथे जिथे गणपती विसरल्याचं दिसेल तिथे यांतली एक किंवा अधिक कारणं दिसतील. ज्यांना दूरदृष्टी साधता येते त्यांना ठरवून स्वार्थाला आणि निष्काळजीपणाला तिलांजली देता येते.
पण हे साधावं कसं?
एका अर्थी ह्याचं फार सोपं उत्तर आहे असं मला वाटलं. दोन छोटे प्रश्न- हेच त्याचं उत्तर.
पहिला प्रश्न- "का?"
आपण जे काही करतो आहोत, करणार आहोत त्या कामाला, कामाच्या उद्देशाला, त्यांत होणाऱ्या प्रत्येक निर्णयाला सतत "का?" हा प्रश्न विचारतो का?.
ह्या प्रश्नाच्या उत्तरामुळे आपल्या चालू असणाऱ्या प्रत्येक कृतीला अर्थपूर्णता (Meaningfulness) प्राप्त होते. प्रत्येक कृती ही कोणत्या तरी अपेक्षित परिणामासाठी, प्रत्येक परिणाम हा कोणत्या तरी उद्दिष्टासाठी, आणि प्रत्येक उद्दिष्ट हे कोणत्या तरी ध्येयासाठी असेच होत गेले की कामाच्या मुख्य गाभ्याची आठवण सतत राहते. हे ध्येय दिसण्यासाठी 'दूरदृष्टी' लागते. आपण जे काही करतो आहोत त्याला सतत "का?" हा प्रश्न विचारून ही दूरदृष्टी तयार होत जाते.
दुसरा प्रश्न- "ह्यासाठी काय?"
जसं कृतीकडून ध्येयाकडे जाता येतं, तसाच उलटा प्रवासही करता येतो. रोजच्या चालू कृतींमागे ‘का?’ हा विचार केलाच पाहिजे. पण त्या सोबत एकदा ध्येय स्पष्ट झालं, की मग ह्या ध्येयासाठी कोणती उद्दिष्टं गाठायची, उद्दिष्टांसाठी कोणते परिणाम, आणि परिणामांसाठी कोणत्या कृती केल्या पाहिजेत असा विचारही करता येतो. ह्यामुळे नवीन केल्या पाहिजेत अशा कृती सापडतात. ध्येय गाठण्यासाठी नवीन कृती सुचण्यामुळे कामामध्ये नवोन्मेषता (Innovation) येते. ह्या रोज नवीन कृती सुचण्यासाठी ध्येयाचा रोजच्या कामाशी संबंध जोडण्यासाठी 'निकटदृष्टी' लागते. आपल्या ध्येयाला "ह्यासाठी काय?" असा प्रश्न सतत विचारून ही निकटदृष्टी तयार होत जाते.
म्हणूनच ज्यांच्याकडे ध्येय बघण्याची दूरदृष्टी आणि त्याचा रोजच्या कृतींशी संबंध लावण्याची निकटदृष्टी आहे त्यांना कामामध्ये अर्थपूर्णता आणि नवोन्मेष आणता येतो. त्यांचं काम टिकाऊ आणि सतत मूल्यवर्धन करत राहणारं होईल.
ज्या कामात अर्थपूर्णता आणि नवोन्मेष आहे तिथे तर गणपतीचं अधिष्ठान असणारच!
-हृषीकेश कुलकर्णी
पुणे
छान लेख, आहे, गणपती कोणता हे कळलं, त्याला घासून पुसून त्याच रूप स्पष्ट करा लागेल.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसुंदर, संक्षिप्त आणि समर्पक लेख
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअतिशय समर्पक आणी परिपूर्ण विचार
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखूपच छान लेख.
ReplyDeleteमुद्दा सांगण्यासाठी दिलेली उदाहरणं अतिशय चपखल..
सुंदर मुद्दे.
लिहीत राहा. वाचायला आवडेल.
धन्यवाद!
Deleteछान आणि वाचनीय लेख.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसुंदर ब्लॉग लिहीला आहे. बऱ्याच गोष्टींचा उहापोह आहे.
ReplyDeletewhy why analysis मुळे बऱ्याच गोष्टींची उत्तरे मिळतात हे अगदी योग्य.
कामाच्या गाभ्याचा विसर पडण्याचे कदाचित अजून एक कारण हे ही असु शकते की सुरक्षित कोषाची झालेली सवय आणि त्यामुळे नवोन्मेषाची भीती --- असो. keep it up
धन्यवाद!
Deleteखरंय.. ती सवय बऱ्याचदा कोशाच्या पलिकडचं न दिसल्यामुळे, दूरदृष्टी कमी पडल्यामुळे लागत असेल का?
पण त्यामुळे नवीन काही करण्याची भीती जडू शकते हे ही पटलं.
अतिशय सोप्या पद्धतीने अर्थपूर्ण विचारांची मांडणी.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअतिशय उत्तम लिखाण आणि वास्तविकता मांडलि आहे. गणपती निमित्तानी अतिशय छान अंजन घातले आहे
ReplyDeleteधन्यवाद!
Delete